||विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले||


मित्रांनो, गेले काही महिने ऑफिस ला येता, जाता, लांबच्या प्रवासात, फावल्या वेळेत फूंकनळी -अर्थात  Youtube (कोणीही यावे आणि ह्या फुंकनळीतून आपला ठेवा आंतरजालावर फुंकून टाकतो) - जिथून जे काही मिळेल, तेथून काही ना काही ऐकण्याचा आणि आपली जिज्ञासा तृप्त करण्याचा, आपले अनुभव विश्व (!) समृद्ध करू पाहण्याचा चाळा जडला आहे. विषयांचे कसलेही बंधन नाही. एखाद वेळेस विद्यार्थी दशेत रूमवर राहताना, खानावळीत आज कुठली भाजी (अर्थात नावडती) ह्याचा अंदाज बांधता येईल, पण एखाद्या विषयाला, संदर्भाला जोडून Youtube आपल्या नजरे समोर काय सादर करेल ह्याचा काहीही नेम नाही. अर्थात हे चिरंतन सत्य आपणा सर्व नेटकर भाविकांना एव्हाना कळून चुकले असेलच. असो! तर ह्या लालसेपोटी बऱ्याच वेळा काही दिग्गज व्याख्यातांच्या,त्यांच्या स्वतःच्या अभ्यासावर, चिंतनावर, कष्टावर बेतलेले "हिरे-मोती" गवसले- जसे होते तश्या भुरळ पडणाऱ्या निसर्गदत्त अवतारात, तर काही व्याख्यातांनी अत्यंत जुन्या काळापासून उपलब्ध असलेल्या दस्त ऐवजावर, अभ्यास करून, एकत्रित करून मांडलेल्या स्वरूपात मिळाली- जसा  का एखादा सुरेख रत्न हार.

तर असे काही (हि) आवडलेले विषय तुमच्या समोर लिखित स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, ह्यात मला खूप काही कळते किंवा आपण साहित्याचे जाणकार आहोत वगैरे अभिनिवेश बिलकुल नसून, एखाद्या खाऊ गल्लीत आवडलेला खाद्य पदार्थ, त्याचे पार्सल आणून समस्त मित्रां सोबत त्याचा आनंद द्विगुणित करण्याचा, अनुभवण्याचा आहे. म्हणूनच लेखाचे शीर्षक- ह्यातील "विश्व" हे आंतरजालाच्या (बोलीभाषेत इंटरनेट) संदर्भात आहे ह्याची नोंद घ्यावी.

नमनालाच घडाभर चे कारण म्हणजे, कबीर म्हणतात त्याप्रमाणे

नथनी दीनी यार ने, तो चिंतन बारम्बार,

और नाक दिनी जिस करतार ने, उनको तो दिया बिसार!!

मला काही अस्सल ऐवज गवसला म्हणून इथे तो आपल्या सारख्या असंख्य समविचारी वाचकांसाठी सामायिक करित आहे. हा प्रयत्न आहे तो त्या आई-वडीलानी आणि असंख्य गुरु, शिक्षक, मित्र, नातेवाईक अश्या लोकांनी आपल्यात  योग्य रुची, आवड निर्माण करून उथळपणा, कमअस्सल ऐवज नाकारणारी मनोवृत्ती निर्माण करणारा संस्कार, विचार दिला. एका अर्थाने हे सर्व गुरूच आहेत. हे असंख्य गुरु ह्या समाजात कैक रूपात भेटले, लहानपणापासून आपल्या देहरूपी अस्तित्वावर संस्कार करत आहेत, करत राहतील. त्या सर्वांविषयी त्रिवार कृतज्ञता व्यक्त करतो.

सर्वप्रथम कुठलीही गोष्ट सुरु करताना आपण देवाचे नाव घेतो आणि  संतांच्या भूमीत आई, ज्ञानोबा माउलीशिवाय मोठे दैवत ते कोणते?

म्हणून ह्यामध्ये पहिले पुष्प आपल्या महाराष्ट्राच्या माउलींच्या एका रचनेवर  स्व.प्रा.राम शेवाळकर यांच्या रसाळ विवेचनाचा आढावा-

 

अरे अरे ज्ञाना झालासी पावन.....- संत ज्ञानेश्वर


अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।

तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥

-----सद्गुरुंच्या कृपा प्रसादाने आलेल्या साक्षात्काराचा अनुभव ज्ञानेश्वरांनी ह्या गीतामध्ये शब्दांकित केला असला तरी, ह्या गीताला दुसरी बाजू अभिप्रेत असू शकते. निवृत्ती नाथांनी महाराष्ट्राच्या अंगणात लावलेल्या ह्या ज्ञानेश्वर रुपी रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले आणि विश्वाला त्याचा आधार झाला.


विचरे विश्व होऊनि विश्वामाजी! असे त्यांनी वर्णन केले आहे.

-----विश्व होऊनच विश्वामध्ये आपण संचार करावा,विहार करावा. हि कोटी ज्ञानेश्वरांना प्राप्त झाली आहे, हाही एक गर्भित अर्थ आहे. हा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील एक अत्यंत दिव्य क्षण आहे, त्यांना खऱ्या अर्थाने प्रचिती आली. ज्या परमेश्वराचा ते बाहेरील जगात धांडोळा घेत होते त्याचे दर्शन झालेच पण खऱ्या परमेश्वराचा प्रत्ययही त्यांना आला.


तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।

फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥

------आपला अंतरात्मा आणि परमात्मा, आपला अंतरात्मा आणि विश्वात्मा ह्यामध्ये भेद नाही, अद्वैताची प्रचिती येणे हा साधकाच्या साधनेतील परमकोटीचा अनुभव माउलींना आला. त्यांना पावन झाल्याची भावना आली, आपण कोण आहोत ह्याची प्रचिती आली, ओळख पटली. ह्याचा शोध घेण्याचा आपण खटाटोप आपण करत होतो तो आपल्यापेक्षा वेगळा नाही ह्याची खूण पटली.


 -------इथे विस्तारपूर्वक सांगताना प्रा शेवाळकर रवींद्र नाथांच्या एका कवितेचा दाखला देतात.

त्या कविते मधली प्रेयसी, आपल्या प्रियकराचा शोध घेऊन, घेऊन थकते आणि डोक्याला हात लावून विलाप करत असताना तिला जाणविते कि ज्याचा आपण शोध घेत होतो तो तर आपल्या डोळ्यांच्या काठावर बसला असल्यामुळेच आपल्याला दिसत नव्हता. एवढेच नव्हे तर तो नसता तर आपल्याला मुळी दिसलेच नसते, कानांना ऐकूही नसते आले, तोंडाने बोलताही नसते आले. आपल्या ज्ञानेंद्रियांना हि शक्ती प्राप्त झाली आहे हि त्याचीच कृपा आहे.


नागपूरच्या एका कवी बोबडे ह्यांच्या कवितेचाही दाखला ते इथे देतात,

सागर पोहत बाहू बळाने,

नाव तयास मिळो न मिळो रे।

स्वयेच जो तेजोनिधी तरणी,

तदगृही दीप जळो न जळो रे।-

------जो स्वतः तेजोनिधी आहे त्याच्या घरी सांजवात लागली काय आणि नाही लागली काय?


जो करी कर्म, अहेतू, निरंतर,

वेद तयाला कळों न कळों रे।

-------जो निष्काम बुद्धीने कर्मयोग् करत आहे, त्याला वेद कळले अथवा नाही कळले- बिघडत नाही.


आणि ओळख पटली ज्यास स्वतःची,

देव तयास मिळो न मिळो रे।


-------ज्ञानेश्वर आता ह्या अनुभवा पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत.


मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।

कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।

घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥


-------आता दिवे लागले आहेत, सर्वत्र प्रकाश पडला आहे. कोणता प्रकाश कोणत्या दिव्याचा हे आता ओळखता येईनासे झाले आहे. प्रकाश देणे हेच दिव्याचे अंतिम ध्येय आहे, प्रकाश देणे ह्यातच प्रकाशाची साफल्यता आहे, वातींची कृतार्थता आहे. आता प्रकाशाची प्राप्ती झाल्यावर वातींची दखल घेण्याची गरज उरत नाही. कारण कार्य प्रगट झाल्यावर कारणा कडे लक्ष देण्याची आवश्यकता उरत नसते.


 

वृत्तीची निवृत्ति अपणांसकट ।

अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥


-------ज्या वृत्तीच्या प्रभावामुळे माणूस सर्व प्रकारच्या कर्म करण्यास प्रवृत्त होतो, जगण्याची स्फूर्ती वाढत असते, त्या वृत्ती आता मुरडून गेलेल्या आहेत. त्या वृत्तीची आकांक्षा आता स्थिरावली आहे. त्या सर्व निवृत्त झालेल्या आहे, त्याला कारणही तसेच आहे ज्या जगामध्ये आपण जगतो ते जग आणि वैकुंठ, वैकुंठ आणि विठ्ठल ह्या सर्वांची एकरूपता त्याच्या प्रत्ययाला आलेली आहे. वैकुंठ आणि पृथ्वी ह्या मध्ये अंतर उरलेले नाही. हे अवघे विश्व त्या चतुर्भुज परमात्म्याने व्यापलेले आहे, ह्याचा अर्थ त्या विश्वविराट परमात्म्या पृथ्वी संपूर्ण व्यापून त्यांच्यासमोर प्रकट झालेला आहे. आता ह्यानंतर वृत्तीना गतिमान होण्याची गरज उरलेली नाहीये.


निवृत्ति परमानुभव नेमा ।

शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥


हे पहिले आणि ह्यापुढील हि सर्व पुष्पे, ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेल्या विश्वात्मक देवाच्या चरणी अर्पण!

त्वदीयं वस्तु गोविन्द: तुभ्यमेव समर्पये |

प्रा. राम शेवाळकर- पसायदान

इति लेखनसीमा।


मनोज इंगुले 

Comments